उर्मिला मातोंडकर यांना ‘सॉफ्ट पोर्न स्टार’ म्हणणाऱ्या कंगनाला नेटकऱ्यांनी झापले


अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण आणि कंगना राणावतविषयी वक्तव्य केले होते. मातोंडकर म्हणाल्या होत्या की, हिमाचल प्रदेशमधूनच ड्रग्स येते. कंगनाने तेथून ड्रग्सविरोधातील लढा सुरू करावा. यावर आता मातोंडकर यांना उत्तर देताना कंगना त्यांचा सॉफ्ट पोर्न स्टार असा उल्लेख केला आहे.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, उर्मिलाने तिच्या संघर्षाची खिल्ली उडवली. मी त्यांचा व्हिडीओ पाहिला. संपुर्ण व्हिडीओत त्या माझी खिल्ली उडवत होत्या.

कंगना राणावत म्हणाली की, माझ्या संघर्षाची खिल्ली उडवत आणि भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी मी त्यांना खूष करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी जिनियस असण्याची गरज नाही की तिकिट मिळणे एवढे अवघड नाही. कंगना पुढे म्हणाली की, उर्मिला या एक सॉफ्ट पोर्न स्टार आहेत. मला माहिती आहे यामुळे गदारोळ उठेल. मात्र नक्कीच त्या आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जात नाहीत. त्या कशासाठी ओळखल्या जातात ? सॉफ्ट पोर्न करण्यासाठी ? जर त्यांना तिकिट मिळू शकते, तर मला का नाही ?

कंगनाने उर्मिला मातोंडकर यांच्या बाबत केलेल्या या वक्तव्यामुळे तिच्यावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच झापले आहे.