चीनच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देणार, एलएसीवर सैन्य तयार – राजनाथ सिंह


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत भारत-चीन सीमेवरील स्थितीची माहिती दिली. संरक्षणमंत्री म्हणाले की, शांतता आणण्यासाठी अनेक करार केले. चीन औपचारिक सीमा स्वीकारत नाही. त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. आपल्या जवानांनी गलवान खोऱ्यात चीनला मोठे नुकसान पोहचवले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, चीनच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देणार आहोत. चीनकडून चिथावणीखोर कारवाई करण्यात आली आहे. आपले सैन्य एलएसीवरील कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. सैन्य सीमेवर मजबूतीने उभे आहे. चीनकडून सर्वात प्रथम सैन्य कारवाई करण्यात आली होती, मात्र आपण त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी होऊ दिले नाही. आम्हाला हा प्रश्न शांततेने सोडवायचा आहे आणि चीनने आपल्याबरोबर कार्य करावे अशी आमची इच्छा आहे.

सशस्त्र दलांनी स्पष्टपणे नियमांचे पालन केले असून, यामुळे चीन मागे हटला आहे. चीनची कारवाई द्विपक्षीय कराराचे उल्लंघन आहे. चीनद्वारे सैनिकांची कारवाई 1993 आणि 1996 च्या कराराविरोधात असल्याचे देखील यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह संसदेत म्हणाले की, मी 130 कोटी देशवासियांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही देशाची मान खाली घालणार नाही. आपल्या देशाबद्दलचा हा आमचा निर्धार आहे. जवान कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे.