संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट टाटा कंपनीकडे

फोटो सौजन्य हिंदुस्तान टाईम्स

दिल्लीत संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट टाटा कंपनीला मिळाले असून हे कंत्राट ८६५ कोटी रुपयांचे आहे. बुधवारी या संदर्भातील घोषणा करण्यात आली. नव्या इमारतीचा मास्टर प्लॅन गेल्या वर्षीच तयार केला गेला होता. राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट यांच्या मध्ये संसदेच्या दोन्ही सदनांसाठी ही इमारत उभी राहत असून त्यात जादा सदस्यांची व्यवस्था केली जाणार आहे. नवीन इमारतीत केंद्रीय सचिवालयाच्या १० नवीन इमारती असतील. राष्ट्रपती भवन, सध्याची संसद व राष्ट्रीय अभिलेखागार या इमारती तशाच ठेवल्या जाणार आहेत.

नवीन इमारतीत संसदेच्या आत भविष्यात खासदार संख्या वाढणार हे लक्षात घेऊन ९०० खासदार बसू शकतील या प्रमाणे आसन व्यवस्था असेल. दोन दोन खासदारांसाठी एक मोठे बाक असेल. संसदेच्या संयुक्त सत्रात याच बाकावर तीन खासदार बसू शकतील. राज्यसभेच्या नवीन इमारतीत ४०० आसने असतील. या इमारतीची प्रत्येक खिडकी वेगळ्या डिझाईनची व आकाराची असेल. त्यातून देशातील विविधता दर्शविली जाणार आहे.

साउथ ब्लॉकच्या सध्याच्या इमारतीमागे नवे पंतप्रधान कार्यालय बनणार असून त्यामागे पंतप्रधान निवासस्थान असेल. सध्याचे पंतप्रधान निवासस्थान ७, लोककल्याण मार्ग येथे आहे. नव्या निवासस्थानामुळे पंतप्रधान कार्यालय जात असतील तेव्हा किंवा संसदेत जाणार असतील तेव्हा वाहतूक थांबवावी लागणार नाही. सध्या पंतप्रधान वरील ठिकाणी जाणार असतील तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबविली जाते.