पेमेंट करू शकणारे हायटेक घड्याळ टायटनने केले सादर

देशातील नामवंत कंपनी टायटनने हायटेक रिस्ट वॉच बाजारात आणली आहेत. या घड्याळांची खासियत अशी की याच्या माध्यमातून युजर पिन न देता कॉन्टॅक्टलेस पेमेंट करू शकणार आहेत. देशात प्रथमच अशी घड्याळे बाजारात आली असून टायटनने अशी पाच घड्याळांची मालिका सादर केली आहे. त्यातील तीन घड्याळे पुरुषांसाठी तर दोन महिलांसाठी आहेत.

ही पॉवरवॉच टॅप करून पीओएस मशीनवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येते. सध्या ही सुविधा फक्त एसबीआय कार्ड होल्डर युजर्स साठी उपलब्ध केली गेली आहे. या माध्यमातून दोन हजारापर्यंत पेमेंट करायचे असेल तर युजरला पिन देण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यापेक्षा अधिक पेमेंट करायचे असेल तर पिन एन्टर करावा लागेल. रिस्टवॉच मधले पेमेंट फंक्शन खास सिक्युअर सर्टीफाईड नियरफिल्ड कम्युनीकेशन चीपच्या सहाय्याने काम करेल आणि ही चीप घड्याळ्याच्या स्ट्रॅप मध्ये लावली गेली आहे.

टायटन पे फिचर योनो एसबीआयने पॉवर्ड असून जेथे पीओएस म्हणजे पॉइंट ऑफ सेल मशीन असेल त्याच जागी काम करेल. या सिरीज मधील पुरुषांसाठीची घड्याळे २९९५,३९९५ व ५९९५ रुपये किमतीची आहेत तर महिलांसाठीची घड्याळे ३८९५ व ४३९५ रुपये किमतीत उपलब्ध आहेत. या घड्याळांना ब्लॅक व ब्राऊन लेदर स्ट्रॅप दिले गेले असून त्यामुळे ती अधिक आकर्षक बनली आहेत.