हा युवक चांगली नोकरी सोडून करतोय हायड्रोपोनिक शेती

फोटो सौजन्य फेसबुक

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यावर लेक्चररची चांगली नोकरी करत असलेले पंजाबच्या मोगा जिल्यातील ३७ वर्षीय गुरकीरपाल सिंग काही तरी वेगळे करायचे या इच्छेने नोकरी सोडून नवीन तंत्रज्ञानाने शेती करत आहेत आणि त्यात त्यांना चांगली कमाई होते आहे. गुरकीरपाल सिंग हायड्रोपोनिक पद्धतीने शेती करत आहेत. यासाठी जमीन, मातीची आवश्यकता नसते तसेच खुपच कमी पाण्यात ही शेती करता येते. गुरकीरपाल सिंग स्वतः ही शेती यशस्वीपणे करत आहेतच पण अनेकांना त्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करत आहेत.

गुरकीरपाल सांगतात अगदी २०० चौरस फुट जागेत सुद्धा ही शेती करता येते. त्यांनी २०१५ मध्ये साडेपाच हजार चौरस फुट जागेत या पद्धतीची शेती करायला सुरवात केली. शेतीचे हे तंत्रज्ञान इस्रायलचे आहे पण गुरकीरपाल यांनी त्यात त्यांच्या गरजेनुसार काही बदल केले आहेत. सर्वप्रथम त्यांनी पॉलीहाउस मध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले व त्यातून दीड लाखाचे उत्पन्न मिळविले. नंतर त्यांनी हरित गृह उभारून त्यात सिमला मिरची आणि टोमॅटोचे उत्पादन घेण्याची सुरवात केली.

त्यांच्या मते या शेतीसाठी जमिनीची किंवा मातीची गरज नसते. प्लास्टिकच्या पाईप मध्ये रोपे लावून त्यांनी टायमरच्या सहाय्याने तापमान नियंत्रण केले जाते. वनस्पतीची मुळे पाण्यात भिजवून पाण्यातूनच त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये पुरविली जातात. या पाण्याचा पुनर्वापर करता येतो. शिवाय खतांचा खर्च करावा लागत नाही. गुरकीरपाल सिंग सांगतात या शेतीतून ते नोकरीत जितका पैसा मिळत होता त्याचा तिप्पट कमाई करत आहेत शिवाय त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे.