यंदा हिवाळ्यात सुद्धा लडाख सीमेवर ठाण मांडणार भारतीय सेना

देशाच्या इतिहासात प्रथमच यंदा भारतीय सेना लडाख मधील चीन सीमेवरच्या फॉरवर्ड पोस्टवर हिवाळ्यात सुद्धा ठाण मांडून राहणार आहे. १९६२ च्या चीन युद्धानंतर प्रथमच हिवाळ्यात उणे ५० डिग्री तापमानात सुद्धा आणि बर्फवर्षाव होत असतानाही भारतीय सेना जवान तेथेच मुक्काम करून राहणार आहेत. गतवर्षीपर्यंत या भागातील बहुतेक सर्व सैनिक ठाणी हिवाळ्यात रिकामी केली जात असत. ऑक्टोबर मध्ये सैनिकांना परत आणण्याची सुरवात होत असे आणि मार्च नंतर पुन्हा सैनिक या ठाण्यांवर तैनात केले जात असत.

सीमा भागात आणि विशेषत लडाख भागात चीनी सैन्याच्या सतत कारवाया सुरु आहेत. त्या संदर्भातला वाद लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. अर्थात अश्या अवघड जागी हिवाळ्याच्या दिवसात सैनिक ठेवणे आर्थिक दृष्ट्या सुद्धा महागात जाते. या भागात एका सैनिकाचा एक वर्षाचा खर्च साधारण १७ ते २० लाखापर्यंत जातो. यात दारूगोळा व अन्य साहित्य अंतर्भूत नसते. या भागात थंडी पासून बचावासाठी विशेष प्रकारचे तंबू, कपडे, गॉगल असे अनेक प्रकारचे साहित्य पुरवावे लागते.

या भागात १४ वे कोअर तैनात असून त्यात ७५ हजार सैनिक आहेत. शिवाय ३५ हजार जादा सैनिक तेथे तैनात केले गेले आहेत. त्याच्यासाठी वर्षभर पुरेल इतका अन्नसाठा अगोदरच केला गेला आहे. शिवाय टँक स्क्वाड्रन व आर्टिलरीच्या तीन डिव्हिजन तेथे हलविल्या गेल्या आहेत. १५ ते १९ हजार फुट उंचीवर या चौक्या आहेत. जगात कोणत्याच देशाची सेना इतक्या उंचीवर तैनात केली गेलेली नाही.

सियाचीन भागात सेना तैनात करण्याचा अनुभव फक्त भारतीय सेनेच्या जवळ आहे. पाक नियंत्रण रेषेवर सुद्धा अति उंच भागात भारतीय सेना तैनात असून हिवाळ्यात सुद्धा ही ठाणी रिकामी केली जात नाहीत. १९९९ च्या हिवाळ्यात कारगील भागात पाकिस्तानने घुसखोरी केल्यानंतर तेथील पोस्ट हिवाळ्यात सुद्धा रिकाम्या केल्या जात नसल्याचे समजते.