पंतप्रधान मोदींचा ७० वा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा

पंतप्रधान मोदी यांनी वयाची ७० वर्षे आज म्हणजे १७ सप्टेंबरला पूर्ण केली असून त्याचा वाढदिवस भाजप देशभर सेवा सप्ताह म्हणून साजरा करत आहे. मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. हा दिवस विश्वकर्मा पूजन दिन म्हणून देशात साजरा होतो.

पंतप्रधान मोदी याना देशातून तसेच विदेशातून शुभेच्छा दिल्या जात असून फिनलंडच्या पंतप्रधान साना मारीन यांनी मोदी याना शुभेच्छा देणारे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भारत फिनलंड संबंध अधिक दृढ होऊन हे संबंध कृती मध्ये उतरावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. मोदी यांनी हे पत्र शेअर केले आहे.

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजऱ्या होत असलेल्या सेवा सप्ताहात रक्तदान, सफाई कर्मचाऱ्यांना कपडे वाटप, शाळांमधून मास्क, सॅनीटायझर, फेस शिल्ड, झोपडपट्टी मधील जनतेला भोजन असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोदींच्या आयुष्यातील काही विशेष प्रसंगांचे फोटो लावले गेले आहेत. केरळ मध्ये स्वच्छता सप्ताह पाळला जात आहे. तामिळनाडूतील कोईमतूर मधील कामची अम्मन मंदिरात ७० किलो वजनाचा लाडू प्रसाद म्हणून देवाला वाहिला गेला तर वाराणशी येथील हनुमान मंदिरात मोदींना दीर्घायुष्य लाभावे म्हणून हनुमान शत्रुंजय स्तोत्र पठन करण्यात आले.