आयपीएल सट्टेबाजी रोखण्यासाठी बीसीसीआयची उपाययोजना

फोटो सौजन्य इनसाईड स्पोर्ट

बीसीसीआयने १९ सप्टेंबरपासून युएई येथे सुरु होत असलेल्या आयपीएलच्या १३ व्या सिझन मध्ये सट्टेबाजीवर चाप लावण्यासाठी ब्रिटन स्थित कंपनी स्पोर्टरडार बरोबर करार केला आहे. ही कंपनी फसवाफसवी तपास प्रणाली सेवा देणारी कंपनी आहे. यंदाची आयपीएल करोना मुळे रिकाम्या स्टेडियम मध्ये होणार आहे. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत हे सामने होणार असल्याने बीसीसीआय समोर सट्टेबाजीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

बीसीसीआय भ्रष्टाचार प्रतिबंध विभाग यामुळे अधिक सजग बनला आहे. करोना मुळे प्रेक्षक नाहीत यामुळे सट्टेबाजी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. आयपीएल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने त्यामुळेच स्पोर्टरडार कंपनीशी करार केला आहे. नुकत्याच झालेल्या गोवा फुटबॉल लीग मधील सहा सामने संशयाच्या घेऱ्यात सापडले होते तेव्हाही याच कंपनीच्या सेवेमुळे असे सामने ओळखणे शक्य झाले होते. फिफा, युईएफए व जगभरातील तमाम लीगसाठी या कंपनीने सेवा दिली आहे.

तामिळनाडू येथे पर पडलेल्या लीग सहित राज्यस्तरावरील टी२० लीग दरम्यान सट्टेबाजीचे विविध आणि वेगळे प्रकार समोर आले आहेत. स्पोर्टरडार खेळांशी संबंधित हेराफेरीच्या प्रकारांची माहिती देण्यासाठी खास सेवा देते. एफडीएस जवळ सामना फिक्सिंगच्या उद्देशाने लावल्या जाणाऱ्या बोली या प्रणाली मुळे समजू शकतात असे समजते.