आनंदवार्ता! नोव्हेंबरपर्यंत भारतात येणार रशियाची कोरोना प्रतिबंधक लस, डॉ. रेड्डीजसोबत झाला करार


डॉ. रेड्डीज लॅबने भारतात कोरोना प्रतिबंधक लसीचे 10 कोटी डोस विकण्यासाठी रशियाच्या लस निर्माता रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) सोबत करार केला आहे. ही लस नोव्हेंबरपर्यंत भारतात येण्याची शक्यता आहे. हा करार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर बीएसईवर डॉ. रेड्डीज लॅबचे शेअर्स वधारले आहेत.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, आरडीआयएफने रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीच्या भारतातील क्लिनिकल ट्रायल आणि वितरणासाठी डॉ. रेड्डीज लेबोरेटरीजसोबत करार केला आहे. करारानुसार रशिया डॉ. रेड्डीज लॅबला 10 कोटी कोरोना लसीचे डोस देणार आहे.

आरडीआयएफचे सीईओ किरिल डिमिट्रिव्ह म्हणाले की, ट्रायल यशस्वी झाल्यास ही लस नोव्हेंबरपर्यंत भारतात उपलब्ध होईल. डॉ. रेड्डीज रशियात मागील 25 वर्षांपासून व्यवसाय करत आहे व ही भारताची एक प्रमुख कंपनी आहे. त्यांनी दावा केला की, ह्यूमन एडीनोव्हायरस ड्युअल वेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित रशियाची लस भारतात कोव्हिड-19 च्या लढ्यात मदत करेल. या प्लॅटफॉर्मवर रशियात मागील एका दशकात जवळपास 250 क्लिनिकल ट्रायल करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

डॉ. रेड्डीजचे मॅनेजिंग डायरेक्टर जीवी प्रसाद म्हणाले की, या लसीचे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल आम्ही भारतात करणार आहोत. जेणेकरून, नियामक अटी पूर्ण करता येतील.