मोदी सरकार भारतीय सैन्यासोबत की चीनसोबत ?, राहुल गांधींचा हल्लाबोल


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा चीनच्या घुसखोरीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार भारतीय सैन्यासोबत आहे की चीनसोबत असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. चीनच्या घुसखोरीबाबत केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांवरून त्यांनी टीका केली आहे.

राहुल गांधींनी ट्विट केले की, तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या. पंतप्रधान म्हणाले की सीमेवर कोणीही घुसखोरी केलेली नाही. त्यानंतर चीनमधील बँकेकडून कर्ज घेतले. त्यानंतर संरक्षणमंत्री म्हणाले की, चीनने देशावर अतिक्रमण केले आहे. आता गृह राज्यमंत्री म्हणाले की कोणतेही अतिक्रमण झालेली नाही.

मोदी सरकार भारतीय सैन्यासोबत आहे की चीनसोबत ?, एवढी भिती कसली ? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत चीनने भारताच्या 38 हजार चौरस किमी जमिनीवर ताबा मिळवल्याचे म्हटले होते. तर आज केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मागील 6 महिन्यात भारत-चीन सीमेवर कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले. या दोन वेगवेगळ्या वक्तव्यावरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला.