देशातील कोरोना स्थिती भयानक, रुग्णांचा आकडा 50 लाखांच्या पार


देशात मागील काही दिवसांपासून दररोज 90 हजारांपेक्षा अधिक कोरोनारुग्ण आढळत आहे. देशातील स्थिती गंभीर झाली असून, एकू कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पुढे केला आहे. मात्र दुसरीकडे सरकारचे म्हणणे आहे की, भारतात बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. सोबतच सरकारने म्हटले की, राष्ट्रीय स्तरावर ऑक्सिजनचा देखील तुटवडा नाही व राज्यांना आवाहन करण्यात आले आहे की हॉस्पिटल स्तरावर योग्य व्यवस्थापन करावे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी आधीच योजना बनवाव्यात. जेणेकरून स्टॉकची कमतरता भासणार नाही.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोव्हिड-19 पासून पुन्हा संक्रमित होणे खूपच दुर्मिळ आहे, मात्र असे होऊ शकते. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशातील 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत, जेथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजारांपेक्षा कमी आहे. 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत जेथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजार ते 50 हजारांच्या मध्ये आहे. तर केवळ 4 राज्य असे आहेत, जेथे 50 हजारांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भूषण यांनी माहिती दिली की, भारतात 38.5 लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले असून, हा जगातील सर्वाधिक बरे होण्याच्या दरांपैकी एक आहे. 40 लाखांपासून 50 लाखांचा आकडा भारताने केवळ 11 दिवसात गाठला आहे. मागील 24 तासात 1054 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण आकडा 80,776 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 78.28 टक्के आहे.

भूषण यांनी सांगितले की, आतापर्यंत 5.8 कोटी नमून्यांची चाचणी करण्यात आली आहे. यातील 76 लाख चाचण्या मागील आठवड्यात केल्या आहेत. सध्या देशात एकूण 9,90,061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.