4 वर्षात 1600 भारतीय कंपन्यांमध्ये चीनची 7500 कोटींची गुंतवणूक, सरकारची माहिती


देशातील 1600 पेक्षा अधिक भारतीय कंपन्यांमध्ये एप्रिल 2016 ते मार्च 2020 या काळात चीनने 1 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) केल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे. राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना यासंदर्भात माहिती देण्यात आली.  यासंदर्भात न्यूज18 ने वृत्त दिले आहे.

सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता की भारतीय कंपन्या, प्रामुख्याने स्टार्ट अपमध्ये चीनी एजेंसीद्वारे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली, हे खरे आहे का ? याचे उत्तर देताना सरकारने मागील 4 वर्षात चीनकडून 1.02 अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक भारतीय कंपन्यांमध्ये झाली असल्याचे सांगितले.

या कंपन्या 46 वेगवेगळ्या क्षेत्रांमधील आहेत. यात पुस्तक छपाई, इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि वीज उपकरणांच्या कंपन्यांनी या काळात चीनकडून 10 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक एफडीआय प्राप्त केला.  ऑटोमोबाईल उद्योगामध्ये चीनने सर्वाधिक 17.2 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. सेवा क्षेत्रात 13 कोटी 96.5 लाख डॉलर्सची गुंतवणूक केली.