म्हणून आग्रा म्युझियमचे छ.शिवाजी महाराज असे नामकरण 

फोटो सौजन्य ARRE

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये आग्रा म्युझियमचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे केले जात असल्याची अचानक घोषणा केल्यावर त्या संदर्भात अनेक तर्कवितर्क सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेली वाद मालिका, बिहार निवडणुका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना अयोध्येत येऊ देणार नाही असा संतगोटातून मिळालेला इशारा असे अनेक तर्क त्यामागे व्यक्त केले जात आहेत. मात्र या संग्रहालयाचे शिवाजी महाराज असे नामकरण करण्यामागे शिवाजी राजांचा आग्रा शहराशी असलेला खास संबंध हेच मुख्य कारण असल्याचे समजते.

मार्च १६६६ मध्ये शिवाजी राजे संभाजी राजांना घेऊन औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे आले तेव्हा औरंगजेबाने त्यांना योग्य तो मान दिला नव्हता असे इतिहास सांगतो. या अपमानाने रागावलेले महाराज दरबारातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांना औरंगजेबाने तुरुंगात हलवून ठार मारण्याची योजना आखली होती पण अतिशय हुशारीने ५ महिन्याच्या बंदी नंतर मिठाईच्या पेटाऱ्यात लपून शिवाजी राजांनी स्वतःची व संभाजी राजांची यशस्वी सुटका करून घेतली होती. हा दिवस होता १३ ऑगस्ट १६६६.

पुष्कळ तपास करूनही औरंगजेब शिवाजी राजांना परत पकडू शकला नाही. शिवाजी राजांचे सारे आयुष्य मोगलांशी लढण्यातच गेले. ६ जून १६७४ मध्ये त्यांनी मराठा साम्राज्याची राजधानी रायगड येथे स्थापन केली आणि झुंझार सेनेची उभारणी केली होती.

योगी आदित्यनाथ यांनी बोलताना प्रथमच मोगल हे आमचे नायक असू शकत नाहीत असे स्पष्ट केले होते. आणि राष्ट्रीयतेची प्रतीके उभारण्यास प्राधान्य असल्याने सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आग्रा म्युझियमचे छत्रपती शिवाजी राजे संग्रहालय करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. या संग्रहालयात मोघल कालीन वस्तू, कागडपत्रे असतीलच पण शिवाजी महाराजांच्या कालखंडाशी संबंधित वस्तू आणि कागदपत्रेही जतन केली जाणार आहेत.