ब्रिटनने परत केल्या १५ व्या शतकातील रामसीतेच्या मूर्ती
फोटो सौजन्य झी न्यूज
तमिळनाडू मंदिरातून ४० वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या १५ व्या शतकातील दुर्मिळ श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ब्रिटीश पोलिसांनी लंडन मधील भारतीय उच्चायोगाच्या सुपूर्द केल्या आहेत. या वेळी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सामील झाले होते. या मूर्ती परत मिळाल्या ही फार चांगली बातमी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पटेल म्हणाले स्वातंत्रप्राप्तीनंतर अश्या चोरी करून परदेशातील नेल्या गेलेल्या दुर्मिळ मूर्तीपैकी फक्त १३ मूर्ती परत मिळविल्या गेल्या होत्या. मात्र २०१४ पासून सातत्याने या साठी प्रयत्न सुरु असून आत्तापर्यंत ४० मूर्ती परत मिळविण्यात यश आले आहे. आगामी काळात हे प्रयत्न सुरूच राहणार असून वाग्देवी प्रतिमा परत मिळण्यासाठी ब्रिटीश संग्रहालयाबरोबर चर्चा सुरु आहे.
परत मिळालेल्या राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती पितळेच्या असून भारतीय धातू कलेचा अप्रतिम नमुना आहेत. तमिळनाडूच्या नागपट्टीनम जिल्यातील विजयनगर कालीन मंदिरात या मूर्ती स्थानापन्न होत्या. १९७८ साली त्या चोरीस गेल्या होत्या.