फ्लिपकार्ट देणार ७० हजार नोकऱ्या

फोटो सौजन्य गेटबंगाल

भारतात नवरात्रापासून सण उत्सवाचे दिवस सुरु होत असल्याने ई कॉमर्स कंपन्या त्या तयारीला लागल्या आहेत. जगातील सर्वात बडी ईकॉमर्स कंपनी अमेझॉनने १ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केल्याच्या पाठोपाठ देशातील नंबर एकची ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने किमान ७० हजार थेट रोजगार आणि लाखो अप्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा केली आहे. करोना काळात ई कॉमर्स कंपन्यांचा व्यवसाय वाढला असून नागरिक बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला अधिक प्राधान्य देत आहेत.

हा ट्रेंड लक्षात घेऊन फ्लिपकार्ट, त्यांची सप्लायचेन मजबूत करण्यासाठी ७० हजार नोकऱ्या उपलब्ध करत असल्याची घोषणा मंगळवारी केली गेली. शिवाय ई कॉमर्सशी संबंधित अप्रत्यक्ष लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. डिलीव्हरी एग्झीक्युटीव्ह, पिकर्स, पॅकर्स, सॉरटर्स अश्या रोजगाराचा सुद्धा यात समावेश आहे. अप्रत्यक्ष रोजगारात फ्लिपकार्टचे सर्व विक्रेते, पार्टनर लोकेशन, किरण दुकान रोजगार यांचा समावेश आहे. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमितेश झा म्हणाले आमच्या बिग बिलियन डे मध्ये सर्वाना संधी आहे. कंपनीने ५० हजाराहून अधिक किराणा दुकानदारांशी भागीदारी केली आहे.