टिकटॉकला पर्याय-  युट्यूबचे शॉर्टस लाँच

जगभर लोकप्रिय झालेल्या चीनी टिकटॉकवर भारतात बंदी आल्यानंतर त्याला पर्याय म्हणून इन्स्टाग्रामने रील फिचर रोलआउट केल्याच्या पाठोपाठ युट्यूबने भारतीय युजर्ससाठी शॉर्टस लाँच केले आहे. त्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली. शॉर्टस प्लॅटफॉर्मवर टिकटॉक प्रमाणेच युजर १५ सेकंदापर्यंतचे छोटे व्हिडीओ बनवून अपलोड करू शकणार आहेत.

भारतात टिकटॉकवर बंदी आल्यापासून अनेक शॉर्ट व्हिडीओ मेकिंग अॅप्स लाँच झाली आहेत त्यात आता युट्यूबची भर पडली आहे. युट्यूब शॉर्टस प्लॅटफॉर्मवर युजरना व्हिडीओ एडीट करण्यासाठी टूल्स दिली गेली आहेत. त्याचबरोबर युट्यूबवर लायसन्स असलेली गाणी व्हीडीओला युजर्स जोडू शकणार आहेत.

कंपनीने केलेल्या घोषणेप्रमाणे शॉर्टस प्लॅटफॉर्म सध्या प्रारंभिक अवस्थेत असून लवकरच त्यात कालानुरूप बदल केले जातील. टिकटॉकचे भारतात २० कोटी युजर्स होते. भारतात युट्यूब अॅक्टीव्ह युजर्सची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे ३०.८ कोटी आहे. युट्यूबचे शॉर्टस किती फायदेशीर ठरेल याचा अंदाज लवकरच येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे