भारताच्या 38 हजार चौरस किमी जमिनीवर चीनचा ताबा, संसदेत राजनाथ सिंह यांची माहिती


पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाबाबत मुद्यांवर उत्तर दिले. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारत-चीन सीमावाद अद्याप निवळलेला नाही. भारताला हा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडवायचा आहे. सीमेवर आपण कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे तयार आहोत.

राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशांचे या गोष्टीवर एकमत झाले आहे की सीमावाद हा जटिल मुद्दा आहे. याचे समाधान शांततापूर्ण संवादातूनच शक्य आहे. एलएसीवर दोन्ही देशांची मत वेगवेगळे आहे. राजनाथ सिंह यांनी माहिती दिली की, चीनने एलएसीवर आणि आतल्या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे व दारुगोळा जमा केला आहे. चीनने लडाख भागात भारताच्या जवळपास 38 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अनाधिकृत ताबा मिळवला आहे. याशिवाय 1963 मधिल कथितरित्या बाउंडरी एग्रीमेंट अंतर्गत पाकिस्तानने पीओकीची 5180 स्क्वेअर किमी भारतीय जमीन बेकायदेशीररित्या चीनला दिली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशांनी यथास्थिती कायम ठेवणे आणि शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करणे आवश्यक आहे. चीनचे देखील हेच म्हणणे आहे. परंतू, चीनने 29-30 ऑगस्टला रात्री पुन्हा पेंगोंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न आपल्या सैनिकांनी हाणून पाडला.

ते म्हणाले, मी 4 तारखेला चीनसमोर परिस्थिती ठेवली. मी हे देखील म्हटले की आम्हाला हा विषय शांततापुर्ण पद्धतीने सोडवायचा आहे. सोबतच स्पष्ट केले की, भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व यांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत.