प्रवासी कामगारांच्या मृत्यूची आकडेवारी नाही, त्यामुळे भरपाई देण्याचा प्रश्नच नाही; सरकारचे स्पष्टीकरण


कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान अनेक प्रवासी कामगारांचा मृत्यू झाला. मात्र अचूक किती कामगारांचा या काळात मृत्यू झाला आहे, याची माहिती सरकारकडे नसल्याचे केंद्रीय कामगार मंत्रालयाने लोकसभेत म्हटले आहे. सोबतच ठोस आकडे नसल्याने नुकसान भरपाईचा प्रश्नच येत नसल्याचे सरकारने म्हटल्याने संसदेत मोठा गदारोळ पाहण्यास मिळेल.

कामगार मंत्रालयाचा अंदाज आहे की लॉकडाऊन दरम्यान, 1 कोटींपेक्षा अधिक प्रवासी कामगार देशभरातून आपआपल्या मूळ राज्यात परतले. संसदेच्या सत्रात विरोधी पक्षाने आपल्या घरी परतलेल्या कामगारांची आकडेवारी आहे का ? ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्यांची माहिती सरकारकडे आहे का व त्यांना भरपाई दिली जाणार का ? असे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना उत्तर देताना सरकारने याबाबतची कोणतीही आकडेवारी आपल्याकडे नसल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लिखित स्वरूपात उत्तर देताना सांगितले की, अशी कोणतीही आकडेवारी नोंदणी करून ठेवलेली नाही, त्यामुळे याबाबत कोणतेही प्रश्न उपस्थित होत नाही.

यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, हे आश्चर्यकारक आहे की कामगार मंत्रालय सांगत आहे त्यांच्याकडे प्रवासी कामगारांच्या मृत्यूचा कोणताही डेटा नाही व त्यामुळे भरपाईबाबत प्रश्न उपस्थित होत नाही. कधी कधी मला वाटते की एकतर आपण सर्व आंधळे आहोत, अथवा सरकारला वाटत आहे ते सर्वांचा फायदा उचलू शकतात.