माझ्या जागी श्वेता आणि सुशांतच्या जागी अभिषेक असतात तर?, कंगनाचा जया बच्चन यांच्यावर निशाणा


कंगना सध्या आपल्या वक्तव्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. आता तिने जया बच्चन यांच्यावर जोरदार टीका करत ट्विट केले आहे. जया बच्चन आज राज्यसभेत बोलताना म्हणाल्या की, ड्रग्सवरून बॉलिवूडच्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. ज्या लोकांना चित्रपट सृष्टीच्या जोरावर नाव कमवले, त्यालाच आज गटार म्हणत आहेत. यावरून आता कंगनाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्विट केले की, जया जी, माझ्या जागी जर तुमची मुलगी श्वेता असते आणि तिला किशोरवयीन असताना मारहाण, अंमली पदार्थ दिले असते आणि गैरवर्तन केले असते तर तुम्हीही असेच म्हणाला असता का? अभिषेकने बुलिंग आणि छळवणुकीबद्दल वारंवार तक्रार केली असती आणि एकेदिवशी फाशी घेतल्याचे आढळले असते तर असेच म्हणाला असता का ? आमच्याबाबत देखील जरा करूणा दाखवा.

यानंतर आणखी एक ट्विट करत कंगना म्हणाली की, गरीबाला चपाती मिळाली म्हणजे पुरेसे आहे, असा विचार बदलण्याची गरज आहे. गरीबाला चपातीसोबतच सन्मान आणि प्रेम देखील हवे आहे. कामगार आणि ज्यूनिअर आर्टिस्टसाठी आवश्यक असलेल्या बदलांची माझ्याकडे यादी आहे. एकेदिवशी पंतप्रधान मोदींशी भेटल्यावर याबाबत चर्चा करणार आहे.

दरम्यान, राज्यसभेत बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, इंडस्ट्री नेहमीच सरकारची मदत करण्यासाठी पुढे आली आहे. जे कोणी चांगले काम करते, सरकारने त्याला पाठिंबा द्यायला हवा. जेव्हा काही अडचण येते त्यावेळी बॉलिवूडमधील लोकच पैसे देतात. देशातील आर्थिक स्थिती ठीक नाही म्हणून लक्ष हटविण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. आम्हाला सरकारकडून देखील समर्थन मिळत नाही. सरकारने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला पाठिंबा द्यायला हवा.