मास्क घाला अथवा मृतांसाठी थडगे खोदा, ‘या’ ठिकाणी नियम मोडणाऱ्यांना भयंकर शिक्षा


जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तरीही अनेकजण व्हायरसला गंभीरतेने न घेता मास्कचा वापर करत नाही. मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून काही ठिकाणी दंड वसूल केला जातो. मात्र इंडोनेशियामध्ये यापेक्षाही भयंकर शिक्षा दिली जाते.

इंडोनेशियाच्या जावा प्रांतात प्रशासनाने मास्क न घालणाऱ्या लोकांना चक्क कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांसाठी थडगे खोदण्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. ईस्ट जावाच्या गेरसिक भागात 8 लोकांना मास्क वापरण्यास नकार दिला. यानंतर नॉबबेटन गावातील एक सार्वजनिक दफनभुमीत थडगे खोदण्याची त्यांना शिक्षा देण्यात आली.

येथे कोरोना रुग्णाच्या अंत्य संस्कारात सहभागी होण्याची कोणालाही परवानगी नाही. त्यामुळे थडगे खोदण्यासाठी लोक मिळणे अवघड झाले आहे. कोर्म जिल्ह्याचे प्रमुख स्यूनो म्हणाले की, आमच्याकडे थडगे खोदणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना असे काम दिले जात आहे. या शिक्षेमुळे ते भविष्यात मास्क न घालण्याची चूक करणार नाही.

दरम्यान, इंडोनेशियामध्ये आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले असून, 8 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.