देशात कोरोना नाही, त्यामुळे मोठ्या लोकसंख्येला लस टोचणार नाही – चीन


जगभरातील अनेक देश कोरोना लसीवर वेगाने काम करत आहे. यातीलच एक देश चीन देखील आहे. चीन कोणत्याही देशाच्या आधी सर्वात प्रथम आपली लस बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता चीनने लसीबाबत धक्कादायक विधान केले आहे. चीनच्या प्रमुख आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आपल्या लोकसंख्येला लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण कार्यक्रम चालवणार नाही.

चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनचे (सीडीसी) डायरेक्टर डॉ गाओ फू म्हणाले की, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लसीची गरज तेव्हाच पडेल जेव्हा येथे कोरोनाचा संसर्ग वाढेल. सध्या चीनमध्ये 8 लसींवर काम सुरू आहे. चीन सर्वात प्रथम लस बाजारात आणण्याची देखील शक्यता अनेक तज्ञांनी यापुर्वी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभरात पसरला असला तरी चीनमधील कोरोना संख्या इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. चीनमध्ये एक्टिव्ह रुग्ण संख्या कमी असल्या कारणाने त्यांच्या लसीचे ट्रायल परदेशात होत आहे. आता चीनच्या अधिकाऱ्याने देशातील सर्व लोकांना लस देणार नसल्याचे म्हटले आहे.

चीनच्या सीडीसी प्रमुखाचे म्हणणे आहे की, जर व्हायरस नियंत्रणात राहिल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज पडणार नाही. काही दिवसांपुर्वी गाओ गू यांनी आपण स्वतः लस टोचली असल्याचा दावा केला होता.