4 वर्षात बँक घोटाळ्यातील 38 आरोपी देशातून फरार


सीबीआयकडून ज्या बँक घोटाळ्यांचा तपास केला जात आहे, त्या घोटाळ्यांमधील 38 आरोपी वर्ष 2015 पासून ते आतापर्यंत देश सोडून फरार झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. खासदार डीन कुरियाकोसे यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक अनियमिततेशी संबंधित प्रकरणात सहभागी असलेले 38 लोक मागील 4 वर्षात देश सोडून फरार झाले आहेत.

अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, अंमलबजावणी संचालनालय 20 लोकांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास इंटरपोलला सांगितले आहे. 14 लोकांविरोधात वेगवेगळ्या देशांना प्रत्यर्पणाचा आग्रह केला जात आहे. फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत 11 जणांविरोधात अर्ज टाकण्यात आला आहे. परंतू, सरकारने या फरारी आरोंपींनी किती मोठा घोटाळा केला आहे, याची माहिती दिली नाही.

सरकारने याआधी 4 जानेवारी 2019 ला अंमलबजावणी संचालनालयचा संदर्भ देत सांगितले होते की, मागील 5 वर्षात बँक घोटाळ्याचे 27  आरोपी देशसोडून फरार झाले आहेत. आता दीड वर्षात हा आकडा 27 वरून 38 झाला आहे.

यातील दोन फरार आरोपी सनी कालरा आणि विनय मित्तलला परत आणण्यात आले आहे. सनी कालरावर पीएनबी बँकेत 10 कोटींच्या फसवणुकीचा तर विनय मित्तलवर विविध बँकेतील 40 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.