रिलायंस रिटेल मध्ये २ अब्ज डॉलर्स गुंतविणार कार्लाईल ग्रुप?

रिलायंस रिटेल व्हेंचर लिमिटेड मध्ये अमेरिकन कंपनी कार्लाईल ग्रुप २ अब्ज डॉलर्स गुंतविणार असल्याची बातमी असून या संदर्भात रिलायंस आणि कार्लाईल ग्रुप मध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते. २ अब्ज डॉलर्स म्हणजे १४. ६९ हजार कोटी रुपये होतात. या पूर्वीच अमेरिकेच्याच सिल्व्हर लीफने ७५०० कोटींची गुंतवणूक रिलायंस रिटेल मध्ये केली आहे. कार्लाईल ग्रुपची मात्र रिटेल क्षेत्रातील ही पहिलीच गुंतवणूक असल्याचे समजते. कार्लाईल ग्रुप भारतातील ऑनलाईन व ऑफलाईन रिटेल कंपन्यात गुंतवणूक करण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्येच रिलायंस रिटेलचा समावेश आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार सिल्व्हर लीफने रिलायंस रिटेल मध्ये १.७५ टक्के हिस्सेदारी घेतली असून केकेआर अँड कंपनी, मुबाडला इन्व्हेस्टमेंट, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटी या कंपन्या सुद्धा रिलायंस रिटेल मध्ये किमान ५ अब्ज डॉलर्स ( ३६.६६ हजार कोटी) गुंतविणार आहेत. रिलायंस रिटेलने २०२० मध्ये भारतीय बाजारात चांगलेच पाय रोवले असून कंपनीची देशात १२ हजार स्टोर्स आहेत.

रिलायंस रिटेल व्हेंचर ही रिलायंस इंडस्ट्रीजची सबसीडरी कंपनी असून सर्व रिटेल कंपन्यांची होल्डिंग कंपनी आहे. ३१ मार्च २०२० मध्ये कंपनीची उलाढाल १,६२,९३६ कोटी होती आणि त्यांना ५४४८ कोटींचा नफा मिळाला होता. जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या कंपन्यात रिलायंस रिटेल ५६ व्या क्रमांकावर आहे. रिलायंस इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे.