युनिट ७३१ प्रयोगशाळेत माणसांंवर झाले होते अमानुष प्रयोग

चीनच्या वुहान प्रयोगशाळेत जगाला ग्रासून राहिलेल्या करोना विषाणूचा जन्म झाल्याचे आरोप आजही केले जात असतानाच चीन मधल्या पिंगफंग येथील एका प्रयोगशाळेत माणसांवर अतिशय अमानुष प्रयोग झाले होते याची माहिती अनेकांना नसेल. ही प्रयोगशाळा युनिट ७३१ नावाने इतिहासत कुप्रसिद्ध आहे. ही प्रयोगशाळा चीन मध्ये असली तरी तिचा चीनशी तसा संबंध नव्हता. कारण ही प्रयोगशाळा जपानच्या शाही सेनेतील सैनिकांनी १९३० ते १९४५ या काळात चीनी लोकांवर अतिशय अमानुष असे प्रयोग करण्यासाठी वापरली होती.

जपान सरकारच्या पुरातत्व विभागातील कागदपत्रात या प्रयोगशाळेचे उल्लेख येतात मात्र प्रयोगशाळे संदर्भातील बहुतेक कागदपत्रे नष्ट केली गेली आहेत. येथे इतके अमानुष प्रयोग केले गेले होते की आजही ते ऐकून अगदी कणखर माणूस सुद्धा घाबरेल. येथे जिवंत माणसांना अमानुष यातना दिल्या जात असत. माणसाचे हातपाय अतिथंड पाण्यात बुडवून ठेवणे व संपूर्ण शरीर आखडल्यावर त्याचे हातपाय उकळत्या पाण्यात बुडवून शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे असाही एक प्रयोग येथे केला जात असे.यात संबंधित माणसाचे हात पाय लाकूड तडकावे असे तडकून मोडत असत. या प्रयोगात अनेकांचा बळी गेला होता.

व्यक्ती किती भयंकर यातना सोसू शकेल हे पाहण्यासाठी येथे जिवंत माणसाला बेशुद्ध न करता त्याचा एक एक अवयव कापून काढला जात असे, जिवंत माणसात प्लेगचे जंतू घालायचे आणि त्याच्या शरीराची जिवंतपणीच चिरफाड करून हे जंतू शरीराच्या कुठल्या भागावर परिणाम करतात हे पहायचा प्रयोग सुद्धा येथे केला जात होता असेही सांगितले जाते. असल्या प्रयोगात हजारो निष्पाप माणसे मारली गेली होती.

या प्रयोगशाळेत कोण काम करत होते त्यांचा चेहरा कधीही जगासमोर आलेला नाही हेही एक विशेष.