फ्रांस ऑटो कंपनीची नवी इलेक्ट्रिक कार सित्रीओन अॅमी

फ्रांसची ऑटो कंपनी सित्रीओनने अॅमी नावाने नवी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही कार १४ वर्षाची मुलेसुद्धा चालवू शकणार आहेत आणि ती चालविण्यासाठी लायसन्सची गरज नाही. ही कार प्रामुख्याने युवा वर्गाला नजरेसमोर ठेउनच डिझाईन करण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत ६ हजार युरो म्हणजे ५.२२ लाख रुपये आहे.

कंपनीने ही कार लाँच केल्यावर त्यांना लगोलग १ हजार ऑर्डर्स मिळाल्याचा दावा केला आहे. या कार साठी ६ किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर दिली असून या कारचे बहुतेक पार्टस प्लास्टिकपासून बनविले गेले आहेत. या कारची बॅटरी ३ तासात फुल चार्ज होते आणि एका चार्ज मध्ये ही कार ७० किमी अंतर तोडते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ४५ किमी. अर्थातच ही कार दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी फारशी योग्य नाही मात्र सिटी ड्राईव्ह साठी ती अतिशय चांगला पर्याय ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

आकाराने अतिशय कॉम्पॅक्ट असलेली ही कार दोन सिटर आहे. तिला सहा कलर्ड अॅक्सेसरीज दिल्या गेल्या आहेत त्यामुळे तिला वेळोवेळी नवीन लुक देणे ग्राहकाला शक्य होणार आहे. या कारसाठी सन रुफ फिचर सुद्धा दिले गेले आहे. कंपनीने कारसाठी होम डिलीव्हरीची सुविधा दिली आहे तसेच ही कार भाड्याने सुद्धा मिळू शकणार आहे.