झंडेवालान मंदिर, १०८ फुटी हनुमान मूर्ती

मंगळवार आणि शनिवार हे बजरंगबळी हनुमानाचे वार समजले जातात. त्यात मंगळवार हा संकटमोचन हनुमान वार मानला जातो. दिल्लीतील करोल बाग परिसरातील झंडेवालान हनुमान मंदिर हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असून येथे १०८ फुट उंचीची हनुमानाची प्रतिमा आहे. विशेष म्हणजे हे बजरंगबळी खास प्रसंगी छाती फाडून आतील श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या मूर्तींचे दर्शन घडवितात.

जगात हनुमानाची ही दोन नंबरची उंच मूर्ती आहे. या ठिकाणाचे नावच संकटमोचन धाम असे आहे. नागाबाबा श्रीसेवागिरी महाराज यांनी येथे तपस्या केली होती. त्यावेळी त्याच्या स्वप्नात येऊन मारुतीरायाने भव्य प्रतिमा उभार अशी इच्छा व्यक्त केली असे सांगितले जाते. त्यानंतर सेवागिरी महाराजांनी १९९४ मध्ये हे मंदिर बांधायला सुरवात केली आणि १३ वर्षे हे काम चालले होते. २००७ मध्ये हनुमानाची ही प्रचंड प्रतिमा येथे उभारली गेली. ही मूर्ती स्वयंचलित आहे. विशेष प्रसंगी हनुमान छाती फाडून आतील मूर्तीचे दर्शन घडवितात.

या मूर्तीच्या पायात सुरसा राक्षशीणीचा चेहरा आहे. तिच्या तोंडातून मंदिरात जाण्याचा मार्ग आहे. आत हनुमानाची छोटी मूर्ती आहे. हे मंदिर तीन मजली असून तिसऱ्या मजल्यार पाचमुखी हनुमान प्रतिमा आहे. अशी कथा आहे की सुरसा राक्षशीणीला हनुमानाने प्रथम विराट रूप दाखवून नंतर अगदी छोटे रूप घेऊन तिच्या पोटात प्रवेश केला होता. त्यावर आधारित ही मूर्ती आहे.