दिल्लीत पॉझिटिव्ह, जयपूरमध्ये नेगेटिव्ह; ‘या’ खासदाराने शेअर केले दोन्ही कोरोना चाचणीचे रिपोर्ट


आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. त्यापुर्वी लोकसभा सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. जवळपास 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. यात राजस्थानच्या नागौर येथील खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) संयोजक हुनमान बेनीवाल यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. मात्र त्यांनी जयपूरमध्ये पुन्हा एकदा चाचणी केली असता, त्यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. त्यांनी आपले दोन्ही रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या दोन्ही रिपोर्ट पैकी कोणता खरा मानावा असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. ट्विटरवर रिपोर्ट शेअर करत ते म्हणाले की, मी लोकसभा परिसरात कोव्हिड-19 ची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये देखील चाचणी केली, जी नेगेटिव्ह आली आहे. दोन्ही रिपोर्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. अखेर यातील कोणता रिपोर्ट खरा समजायचा ?

बेनीवाल यांनी माहिती दिली की, त्यांनी 11 सप्टेंबरला लोकसभेच्या परिसरात कोरोना चाचणी केली होती. यानंतर 13 तारखेला जयपूर येथील घरी असताना लोकसभा सचिवालयाकडून कोरोनाची लागण झाल्याचे फोनवरून समजले. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यावरून जयपूर येथील हॉस्पिटलमध्ये चाचणी केली असता, ती नेगेटिव्ह आली आहे.

त्यांनी सांगितले की, मी पुर्णपणे स्वस्थ आहे. तिसरा रिपोर्ट देखील नेगेटिव्ह आला आहे. क्वारंटाईन कालावधी पुर्ण केल्याची माहिती देखील त्यांनी दिली. दरम्यान, याआधी जुलै महिन्यात देखील बेनीवाल यांना कोरोनाची लागण झाली होती. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली होती.