17 खासदारांना कोरोनाची लागण, शिवसेनेच्या एका नेत्याचाही समावेश


आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. कोरोना संकटाच्या काळात होणाऱ्या अधिवेशनात विशेष काळजी घेतली जात आहे. खासदारांना कोरोना किट देण्यात आलेले आहे. याशिवाय त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक 12 खासदार भाजपचे आहेत. वायआरएस काँग्रेसचे 2, तर शिवसेना, डीएमके आणि आरएलपीच्या प्रत्येकी 1 खासदाराचा समावेश आहे.

यामध्ये मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, परवेश साहिब सिंह वर्मा, सुखबीर सिंह, प्रताप राव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्‍वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्‍यपाल सिंहसह अन्य काही खासदारांचा समावेश आहे.

सर्व खासदारांची 13 आणि 14 सप्टेंबर रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्यातील 17 जणांची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. खासदारांच्या हजेरी लावण्याची पद्धत देखील बदलण्यात आली असून, आता ‘अटेंडेंस रजिस्‍टर’ अ‍ॅपद्वारे आपली उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. लोकसभेत खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे शिल्ड देखील लावण्यात आलेले आहे.

अधिकृत आकड्यानुसार, राज्यसभेच्या 240 खासदारांपैकी 97 खासदारांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे. तर 20 असे खासदार आहेत ज्यांचे वय 80 पेक्षा अधिक आहे. यात 87 वर्षीय मनमोहन सिंह आणि 82 वर्षीय एके एंटनी यांचा समावेश आहे.