कोरोना : 2024 पर्यंत सर्वांना लस मिळणे शक्य नाही – अदर पुनावाला


वर्ष 2024 पर्यंत एवढ्या लसीचे उत्पादन होणार नाही, जेवढे जगभरातील सर्व लोकांना मिळायला हवे, असे मत जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी व्यक्त केले आहे. पुनावाला यांनी भारतातील सर्व लोकांपर्यंत लस पोहचविण्याविषयी देखील चिंता व्यक्त केली आहे.

आज तकच्या वृत्तानुसार अदर पुनावाला म्हणाले की, औषध कंपन्या आपली उत्पादन क्षमता एवढी वाढवू शकणार नाहीत की कमी वेळेत संपुर्ण जगाला लस देता येईल. पृथ्वीवरील सर्व लोकांना लस देण्यास 4 ते 5 वर्ष लागतील. जर एका व्यक्तीला लसीच्या दोन डोसची गरज पडल्यास संपुर्ण जगात 15 अब्ज डोसची गरज भासेल.

भारतातील 140 कोटी जनतेपर्यंत लस पोहचविण्याविषयी देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. कारण लसीच्या वितरणासाठी कोल्ड चेन सिस्टम नाही. लस तयार झाल्यावर फ्रीजरमध्ये ठेवावी लागते व एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहचविण्यासाठी कोल्ड चेन सिस्टमची गरज असते. पुनावाला म्हणाले की, मला अद्याप अशी कोणती योजना दिसत नाही ज्याद्वारे 40 कोटी (भारतातील) लोकांना लस मिळेल. तुमच्याकडे उत्पादन आहे, मात्र त्याचा तुम्ही वापर करू शकत नाही, अशी कोणतीही स्थिती निर्माण व्हावी, असे तुम्हाला वाटत नाही.

त्यांनी माहिती दिली की, लसीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सौदी अरेबियाचा पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (पीआयएफ), अबू धाबी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनी एडीक्यू आणि अमेरिकेची प्रायव्हेट इक्विटी फर्म टीपीजी सोबत 600 मिलियन डॉलर्स निधी जमवण्यासाठी चर्चा सुरू आहे.