प्रचारासाठी कंगनाची गरज नाही, आमच्याकडे सुपरस्टार मोदी आहेत – फडणवीस


भाजपला कोणत्याही दुसऱ्या स्टार्सची प्रचारासाठी गरज नसून, आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, जे देशातील सर्वात मोठे सुपरस्टार आहेत, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कंगना भाजपासाठी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मत मांडले.

पुढील काही महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. प्रचारासाठी भाजपने  देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून, ते बिहारमध्ये जोरदार प्रचार देखील करत आहे.

सध्या महाराष्ट्रात कंगनाच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यावरून वादंग उठले आहे. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या अनाधिकृत ऑफिसवर देखील कारवाई केली होती. यानंतर महाराष्ट्र भाजपने राज्य सरकारवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर कंगना बिहारमध्ये भाजपसाठी प्रचार करणार का असे विचारले असता, फडणवीस म्हणाले की, आम्हाला कोणत्याही स्टारची गरज नाही. भारती जनता पक्षाचे सर्वात मोठे स्टार आणि देशाचे सुपरस्टार नरेंद्र मोदीजी आमच्यासोबत आहेत. त्यांचे कॅम्पेनच आमच्यासाठी खूप आहे. त्यांच्या बळावरच आम्ही देशात जिंकलो व सर्व ठिकाणी जिकू.

सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, कंगना राणावतशी लढत बसण्यापेक्षा कोरोनाशी लढाईत आपला वेळ द्यावा.