कोरोना संकटात 30 हजार जणांना नोकरी देणार ‘ही’ कंपनी


कोरोना संकटात हजारो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र दुसरीकडे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली संधी असून, सणांच्या काळात ईकॉम एक्सप्रेस कंपनी 30000 लोकांना नोकरी देण्याची योजना बनवत आहे. सामानांच्या डिलिव्हरीसह लॉजिस्टिक सुविधा देणारी कंपनी ईकॉम एक्सप्रेस पुढील काही महिन्यात लोकांना रोजगार देणार आहे. हा रोजगार अस्थायी स्वरूपातील असेल. कंपनी सणाच्या काळात वाढणाऱ्या ग्राहकांच्या मागणीला पुर्ण करण्यासाठी नवीन लोकांची भरती करणार आहे.

कोरोना व्हायरस संकटाच्या आधी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 23 हजार होती. कंपनी लॉकडाऊननंतर वाढती ऑनलाईन ऑर्डरची मागणी पुर्ण करण्यासाठी मागील काही महिन्यात 7500 लोकांना नोकरी दिली आहे. कोरोना संकटामुळे नागरिक किराणा सामान, औषध व इतर वस्तू ऑनलाईन मागवण्यालाच प्राधान्य देत आहेत.

कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ दीप सिंगला म्हणाले की, महामारीने ई-कॉमर्स उद्योगाला नवीन उंचीवर पोहचवले आहे. सणांच्या काळात ग्राहक खरेदीची मोठी योजना बनवत आहेत व त्यांची मागणी पुर्ण करण्याचे आम्ही सुनिश्चित करत आहोत. आम्ही नियुक्ती करणे सुरू केले आहे. ही प्रक्रिया 10 ऑक्टोंबरपर्यंत सुरू राहील.

त्यांनी सांगितले की, मागील वर्षी सणाच्या काळात 20 हजार लोकांना नोकरी दिली होती. हे रोजगार अस्थायी असले तरी यातील एक तृतीयांश स्थायी झाले.