दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला अटक


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली हिंसाचार प्रकरणात जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला अटक केले आहे. उमर खालिदचे नाव दिल्ली दंगल प्रकरणातील प्रत्येक चार्जशीटमध्ये आहे. दिल्ली पोलिसांनी डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधीचे त्याचे भाषण आणि दिल्ली हिंसाचार प्रकरणात इतर आरोपींसोबतचे कॉल रेकॉर्ड, बैठक आणि आरोपींच्या जबाबात त्याला सुत्रधार असल्याचे सांगत अटक करण्यात आले आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) त्याला अटक केले आहे.

दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने जाफराबाद येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात FIR No. 50/20 मध्ये देवांगना कलिता, नताशा नरवाल, गुलफिशा फातिमा यांच्याविरोधात सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीटमध्ये या लोकांना आरोपी घोषित केले आहे. मात्र त्यांना आपल्या जबाबत प्रोफेसर अपूर्वानंद, योगेंद्र यादव, सीताराम येचुरी , डॉक्यूमेंट्री फिल्मकार राहुल रॉय, इकोनॉमिस्ट जयती घोष, मतीन अहमद, अमानतुल्लाह खान आणि उमर खालिद यांचे देखील नाव घेतले आहे.

दिल्ली पोलिसांनुसार हिंसाचारात यांची देखील भूमिका होती. पोलिसांनी चार्जशीटमध्ये यांना आरोपी बनवले नसले तरीही त्यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल या प्रकरणात मोठ्या षडयंत्राचा तपास करत आहेत.

उमर खालिद ‘युनायडेट अगेंस्ट हेट’चा सह-संस्थापक आहे. या संस्थेने माहिती दिली की 11 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी उमर खालिदला सुत्रधार म्हणून अटक केले. दिल्ली पोलीस तपासाच्या नावाखाली विरोध प्रदर्शनाला गुन्ह्याच्या श्रेणीत आणत असल्याचे म्हटले आहे.