‘टीक-टॉक मायक्रोसॉफ्टला विकणार नाही’, बाईटडान्सने नाकारली ऑफर


मागील काही दिवसांपासून शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉक अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहे. टीक-टॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्स अ‍ॅपचे अमेरिकन ऑपरेशन मायक्रोसॉफ्टला विकणार असल्याच्या देखील चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र आता बाईटडान्स आणि मायक्रोसॉफ्टमधील बोलणी थांबली असून, बाईटडान्स मायक्रोसॉफ्टचा प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत मायक्रोसॉफ्ट कंपनीने माहिती दिली आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये टीक-टॉक वादाचे केंद्र ठरले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बाईटडान्सला इशारा देत कंपनीने आपले अमेरिकन ऑपरेशन विकावे अथवा अ‍ॅपवर बंदी घातली जाईल असे म्हटले होते. ट्रम्प यांनी दावा केला होता की, चीन टीक-टॉकचा वापर सरकारी कर्मचाऱ्यांचे लोकेशन ट्रॅक करणे, ब्लॅकमेल करणे आणि कॉर्पोरेट हेरगिरीसाठी करत आहे.

टीक-टॉकच्या मालकचा उल्लेख करत अमेरिकेच्या दिग्गज टेक कंपनीने म्हटले की, बाईटडान्सने आम्हाला सांगितले की टीक-टॉकच्या अमेरिकन ऑपरेशनला मायक्रोसॉफ्टला विकणार नाही. आम्हाला विश्वास आहे की आमचा प्रस्ताव टीक-टॉक युजर्ससाठी चांगला आहे आणि सोबतच राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांचे देखील रक्षण करते.

मायक्रोसॉफ्टसोबतच ओरेकल कंपनीला देखील टीक-टॉक खरेदी करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.