संसदेत पोहचले बॉलिवूड ड्रग्स प्रकरण, खासदाराने मांडले मत


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील ड्रग्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एनसीबीचा दावा आहे की या प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांचे नाव समोर येत आहे. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील पोहचले.

भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी आज ड्रग्सचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. रवी किशन म्हणाले की, ड्रग्सची तस्करी आणि युवकांद्वारे याचे सेवन आपल्या देशासाठी नवीन आव्हान म्हणून समोर आले आहे. युवकांना भटकवण्याचा कट रचून चीन आणि पाकिस्तान पंजाब व नेपाळद्वारे संपुर्ण देशात ड्रग्स पसरवत आहेत.

खासदार रवी किशन म्हणाले की, ड्रग्सच्या व्यसनाचे शिकार बॉलिवूड देखील आहे. एनसीबी चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो की दोषींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी. जेणेकरून, शेजारी देशांच्या कट संपुष्टात येईल.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत रिया चक्रवर्तीसह अनेकांना अटक केले आहे.