राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टरवरून लालू, राबडी गायब

बिहार मध्ये नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालायाबाहेर लावल्या गेलेल्या भल्या मोठ्या पोस्टर मधून बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद आणि राबडी देवी गायब झालेले दिसत आहेत. निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून सर्वच राजकीय पक्ष त्यांची पोस्टर लावत आहेत मात्र आरजेडी कार्यालयाच्या बाहेर लागलेले पोस्टर विशेष चर्चेत आहेत.

या पोस्टरवर लालूपुत्र तेजस्वी यांचा एकमेव फोटो असून कोणत्याही अन्य नेत्याचा फोटो त्यावर नाही. या पोस्टरवर ‘नई सोच, नया बिहार, युवा सरकार अबकी बार’ असा मजकूर आहे. विरोधकांनी आत्ताच लालू राबडीचे सरकार म्हणजे जंगलराज अशी टीकेची झोड उठवली असल्याने तेजस्वी अधिक सावध झाले आहेत. लालू राबडी याच्या काळात घडलेल्या काही वादग्रस्त प्रकरणात तेजस्वी अगोदरच माफी मागून मोकळे झाले आहेत.

यंदा बिहार मध्ये मुख्य चुरस एनडीए आणि महागठ्बंधन आघाडी यांच्यात आहे. सर्व राजकीय दले आपापल्या परीने मतदारांना आपल्या बाजूला वळविण्याच्या कामात गुंतली आहेत. त्यामुळे तेजस्वी यांचे पोस्टर विशेष चर्चेत आले असून तेजस्वी यांनी हेच पोस्टर फेसबुकवर शेअर केले आहे.

चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले लालूप्रसाद यांनी जामिनासाठी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. लालूनी याचिकेत त्यांना मधुमेह, किडनी, प्रोस्टेट ग्रंथी, हृदयरोग, रक्तदाब, हेपीटायटीस असे अनेक विकार जडल्याचे नमूद केले असून त्यासाठी जामीन मिळावा असे म्हटले आहे. लालू सध्या रांची येथील रिम्स मध्ये दाखल आहेत.