कर्नल जमवाल, पँँगोन्ग लेक हिरो

गेल्या महिन्यात भारतीय सेनेने पेंगोंग लेकच्या परिसरातील ज्या उंच पहाडांवर अगोदरच मोर्चे बांधणी करून चीनी सैन्याची पळापळ उडविली त्या मागे जसे सैन्याचे कठोर परिश्रम आणि हिम्मत होती तसेच त्यांना या उंच पहाडी भागात मोर्चे बांधणी करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या कर्नल जमवाल यांचेही मोठे योगदान होते. कर्नल जमवाल यांनीच भारतीय लष्कराला ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप, गुरंग हिल, मुकाबरी हिल,मगरी हिल अश्या मोक्याच्या पहाडावर मोर्चे बांधणी करण्यासाठी धोरणात्मक नीती आखली होती.

कोण आहेत हे कर्नल जमवाल? हिमालयाच्या अतिउंच दुर्गम भागात जेथे नुसते जाणे सुद्धा जेथे मोठे आव्हान आहे, तेथे भारतीय सेनेच्या जवानांचे ठाणे उभे करणे किती मोठे आव्हान आहे याचा विचार केला पाहिजे. कर्नल जमवाल हे भारतीय सेनेतील एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहेच पण जगाच्या सात खंडातील सर्वात उंच शिखरेही पादाक्रांत केली आहेत.

मुळचे जम्मू काश्मीरचे असलेले रणबीरसिंग जमवाल यांचे वडील सुद्धा भारतीय सेनेत होते. जमवाल यांनी साधा सैनिक म्हणून भारतीय सेनेत प्रवेश केला होता. लष्करातील सर्वात कुशल गिर्यारोहक असा त्यांचा लौकिक आहे. फेब्रुवारी मध्येच त्यांना लेह येथे पोस्टिंग दिले गेले होते आणि तेव्हापासूनच त्यांनी स्पेशल फोर्स टूटू रेजिमेंट मधील सैनिकांना उंच पहाडी भागात असे तळ उभारायचे. तेथील आव्हानत्मक परिस्थितीला कसे तोंड द्यायचे आणि देशाच्या सीमेचे चोवीस तास कसे संरक्षण करायचे याचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली होती.

कर्नल जमवाल हे मुळचे जाट रेजिमेंटचे. फेब्रुवारी पासून तयारी केल्यामुळे जमवाल या महिन्यात भारतीय सैनिकांना पहाडावरील अति दुर्गम भागात घेऊन जाऊ शकले. या काळात तेथे उणे १० ते १५ डिग्री तापमान आहे. प्यायला पाणी नाही, सैनिकांना २४ तासात एक ते दोन तास झोप मिळू शकते आणि २० ते २२ तास ड्युटी करावी लागते आहे. चोवीस तास डोळ्यात तेल घालून सीमेवरून चीनी घुसत नाहीत ना यावर पाळत ठेवावी लागते आहे. पण जमवाल यांनी दिलेल्या कडक प्रशिक्षणांमुळे भारतीय सैनिक या परिस्थितीत सुद्धा अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत.

जमवाल याना २०१३ मध्ये गिर्यारोहकांसाठी मानाचा असलेला तेन्जिंग नोर्गे सन्मान मिळाला आहे. २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी जमवाल एव्हरेस्ट बेस कॅम्पवर होते. तेव्हा त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी होऊन अनेकांचे प्राण वाचविले आहेत. २००९ मध्ये उत्तरांचल मधील माउंट माना येथे त्यांना हिमबाधा झाल्याने एक बोट गमवावे लागले आहे. त्यावेळी ते २३ हजार फुट उंचीवर सात तास हिमवादळात अडकले होते. त्यांना भारतीय सेनेची अनेक शौर्य पदके मिळालेली आहेत.