सुरत व्यापाऱ्याने कंगना समर्थनार्थ आणली मनकर्णिका साडी

महाराष्ट्र सरकार आणि कंगना राणावत याच्यात पेटलेल्या वागयुद्धात कंगनासाठी देशभरातून अनेक समर्थक पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरत येथील आलीया फॅब्रिकचे मालक रजत डावर यांनी वेगळ्याच पद्धतीने कंगनाचे समर्थन केले आहे. त्यांनी या निमित्ताने मनकर्णिका प्रिंट साडी बाजारात आणली असून या साडीवर कंगना आम्ही तुझे समर्थन करतो अश्या आशयाचा मजकूर आणि कंगनाचा फोटो प्रिंट केला आहे. या साडीचे लॉन्चिंग आज होणार असून त्यापूर्वीच डावर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात या साडीसाठी ऑनलाईन ऑर्डर आल्या आहेत.

या संदर्भात बोलताना रजत म्हणाले, कंगनाने काही वक्तव्ये केल्यावर तिच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने केलेली कारवाई बरोबर नाही. तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जे घडते आहे ते चुकीचे आहे. आम्ही कंगनाचे समर्थन करण्यासाठी ही विशेष साडी बाजारात आणली असून १ हजार रुपयांपासून तिची किंमत सुरु होते आहे.

करोना साथीमुळे आता सोशल मिडीयाच्या मध्यमातून व्यापार सुरु असल्याचे सांगून डावर म्हणाले आमच्याकडे या साडीसाठी देशभरातून ऑर्डर येत आहेत. याचा अर्थ देशभरातील महिला कंगनाचे समर्थन करत आहेत. दरम्यान कंगनाने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल कोशारी यांची भेट घेऊन तिला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. कोशारी यांनी कंगनाचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

यापूर्वी अश्याप्रकारे काही वादग्रस्त बॉलीवूड कलाकार, नरेंद्र मोदी, बाहुबली, प्रियांका गांधी यांचे फोटो असलेल्या साड्या सुद्धा बाजारात आणल्या गेल्या होत्या.