संसदेच्या अधिवेशनात प्रथमच घडणार इतिहास

करोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संसदेचे अधिवेशन आज सुरु होत आहे. १७ व्या लोकसभेच्या चौथ्या सत्राची सुरवात आज सकाळी ९ वा. झाली. हे अधिवेशन अनेक बाबींमुळे ऐतिहासिक होणार आहे.

यात संसद अधिवेशनच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सदनातील चेम्बर व गॅलरींचा वापर केला जाणार आहे. १९५२ नंतर प्रथमच हे घडत आहे. तसेच या अधिवेशनात प्रश्न काल रद्द करण्यात आला असून शून्यकाळ सुद्धा मर्यादित केला गेला आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे आणि शनिवार रविवारी सुद्धा सुट्टी न घेता सलग १८ दिवस काम होणार आहे.

या वर्षी सकाळी ९ ते १ आणि दुपारी ३ ते ७ अशा दोन सत्रात संसदेचे कामकाज केले जाणार असून एकूण ४७ विधेयके सादर केली जाणार आहेत. अधिवेशनासाठी ४००० जणांची कोविड टेस्ट केली गेली असून त्यात खासदार, स्टाफ आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. पाच खासदार करोना पोझिटिव्ह मिळाल्याने अधिवेशनात उपस्थित राहू शकणार नाहीत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राहुल यांच्यासह तपासणीसाठी अमेरिकेला गेल्या असल्याने त्या काही दिवस अनुपस्थित राहणार आहेत.

करोना संक्रमण रोखण्यासाठी रोज सहा वेळा एसी बदलले जाणार आहेत. सर्व खासदारांना डीआरडीओ किट दिली जात आहेत. त्यात ४० डिस्पोजेबल मास्क, एन ९५ मास्क, सॅनिटायझरच्या वीस बाटल्या, ४० ग्लव्ज व टच फ्री हुक समाविष्ट आहेत. पत्रकारांना मोबाईलवरून लाईव टेलिकास्टची परवानगी नाकारली गेली असून संसद परिसरात कुणाही मंत्री, खासदाराची मुलाखत घेता येणार नाही.

संसद अधिवेशन काळात कॅन्टीन बंद राहणार आहे. खासदारांना नास्ता, जेवणाचे पॅक दिले जाणार आहेत. तृणमूलचे सात खासदार गैरहजर राहणार आहेत तर भाजपाचे दोन खासदार उपस्थित राहू शकणार नाहीत.