नासा खाजगी कंपनीकडून खरेदी करणार चंद्रावरील माती


अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने खाजगी कंपनीकडून चंद्रावरील माती खरेदी करणार असल्याची माहिती दिली आहे. जेणेकरून, चंद्रावर उत्खनन कार्य सुरू करता येईल. नासाने खाजगी कंपन्यांकडे रोव्हर्सचा उपयोग करून चंद्रावरून माती आणि दगड कसे जमा करता येतील याविषयी प्रस्ताव मागितला आहे.

नासा 50 ते 100 ग्रॅम नमुन्यांच्या खरेदीसाठी 15 ते 25 हजार डॉलर्स देण्यासाठी तयार आहे. नासाने सांगितले की, चंद्रावरील दगड आणि माती ला जमा करणे आणि नासाला सोपवणे हे चंद्रावर अंतराळ व्यापार सुरू करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असेल. हा उपक्रम भविष्यात अंतराळ उद्योजक’ खाणकाम कसे करेल याची प्राथमिक तत्त्वे स्थापित करण्यात मदत करेल. याशिवाय यामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांना देखील मदत मिळेल.

वर्ष 2024 आधी चंद्रावरील माती मिळवण्याचा नासाचे उद्देश आहे. कारण नासा पुन्हा चंद्रांवर मानवाला उतरवण्याची योजना बनवत आहे. कंपन्यांना चंद्रावरील धूळ किंवा माती जमा करावी लागेल, मात्र पुन्हा पृथ्वीवर पाठवण्याची गरज नाही. प्रत्येक कंपनीला त्यांच्याद्वारे जमा करण्यात आलेल्या नमुन्यांचे फोटो नासाला पाठवावे लागतील. याशिवाय या नमुन्यांसंदर्भातील डेटा देखील द्यावा लागेल. हे नमुने 50 ते 100 ग्रॅमपर्यंत असणे गरजेचे आहे.

एका ब्लॉग पोस्टमध्ये नासाचे प्रशासक जिम ब्रिडन्स्टाईन म्हणाले की, आम्ही आमची धोरणे नव्या शोधाच्या जगात समोर  आणत आहोत, ज्यामुळे मानवी सभ्यतेला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.