सरकारचा मोठा निर्णय, कोरोना काळात नोकरी गमवलेल्या कामगारांना मिळणार 50 टक्के वेतन!


कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. या काळात लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अंदाजानुसार, कोरोना संकटामुळे आतापर्यंत 1.9 कोटी लोकांनी नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच 50 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. आता मोदी सरकार बेरोजगार औद्योगिक कामगारांना मोठा दिलासा देणार आहे. सरकारने अशा कामगारांना अर्धा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनुसार जवळपास 42 लाख लोकांना याचा फायदा होईल. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे.

लोकांच्या उपजीविकेवरचे संकट टाळण्यासाठी कामगार मंत्रालयाने अटल विमा व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत मदत वाढविण्याच्या निर्णयाला अधिसूचित केले आहे. या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगममध्ये (ईएसआयसी) रजिस्टर्ड कामागारांना 50 टक्के बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. म्हणजेच कोरोना काळात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना 3 महिन्यांपर्यंत 50 टक्के वेतन बेरोजगारी भत्ता म्हणून मिळेल. 24 मार्च ते 31 डिसेंबरपर्यंत नोकऱ्या गमावलेल्या कामगारांना याचा फायदा मिळेल.

कर्मचारी राज्य विमा निगमच्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली जाईल. आधी ही रक्कम 25 टक्के होती. जी कोरोना संकटामुळे वाढवून 50 टक्के करण्यात आली आहे. अटल विमा व्यक्ती कल्याण योजना 30 जून 2021 पर्यंत लागू राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ESIC शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज तपासणीनंतर माहिती योग्य आढळल्यास त्यांना अर्धा पगार दिला जाईल. रक्कम कामगाराच्या बँक खात्यात जमा होईल.