मराठा समाजाने संयम बाळगावा; मोर्च काढू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देताना खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवला आहे. राज्य सरकारने न्यायालयात योग्यरित्या आपली बाजू मांडली नसल्याची टीका होत होत आहे. आज सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्यास सांगितले आहे. सोबतच राज्य शासन मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षण दिले होते. या आरक्षणाला कायम राखण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यात शासन कुठेही कमी पडलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणविषयी न्यायालयीन लढ्यात मागील सरकारने दिलेले वकील कायम ठेवतानाच त्यांना अतिरिक्त वकील देण्यात आले होते. तसेच इतर राज्यांप्रमाणे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या बेंचसमोर व्हावी अशी मागणी राज्याने केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करताना मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यांच्या बाबतीत मोठ्या बेंचच्या समोर जाताना आरक्षणाला अशी स्थगिती दिलेली नाही.

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की, मराठा समाजाने संयम बाळगावा. सरकार तुमच्या पाठिशी असताना रस्त्यावर कशासाठी उतरायचं? हे सरकार तुमचे आहे. राज्य शासन मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल. सोबतच त्यांनी याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणे झाले असल्याचे सांगितले.