विमानात फोटोग्राफी केल्यास उड्डाण सेवेवर 2 आठवड्यांसाठी घातली जाणार बंदी


अभिनेत्री कंगना राणावत चंदीगडवरून विमानाने मुंबईत दाखल झाली. मात्र या दरम्यान विमानात कंगनाची प्रतिक्रिया जाणून घेताना पत्रकारांकडून कोणत्याही सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यात आले नाही. या प्रकरणानंतर आता नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) कडक पावले उचलली असून, विमानात कोणत्याही प्रकारे फोटोग्राफी करताना आढळल्यास त्या मार्गावरील विमानसेवा 2 आठवड्यांसाठी निलंबित केली जाईल, असे म्हटले आहे.

विमानात व्हिडीओग्राफी अथवा फोटोग्राफी करणे हे एअरक्राफ्टच्या 1937 च्या नियम-13 चे उल्लंघन आहे. डीजीसीएला बुधवारी इंडिगोच्या चंदीगड-मुंबई दरम्यानच्या उड्डाणात सुरक्षा आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन झाले नसल्याची माहिती मिळाली होती. याचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले होते. यानंतर डीजीसीएने इंडिगोला योग्य ती कारवाई करण्यास सांगितले होते.

पत्रकार आणि कॅमेरामन कंगना राणावतची प्रतिक्रिया घेण्यासाठी विमानात धक्काबुक्की व गर्दी करतानाचे व्हिडीओ समोर आले होते. यानंतर डीजीसीएने आता कठोर पावले उचलत अशी घटना घडल्यास त्या मार्गावरील विमानसेवा 2 आठवड्यांसाठी बंद केली जाईल असे सांगितले. सोबतच जे घटनेस जबाबदार आहे त्यांच्यावर एअरलाईन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत सेवा सुरू केली जाणार नाही.