निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक

मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणात समता नगर पोलिसांनी आतापर्यंत 6 शिवसैनिकांना अटक केले आहे. ज्यात शिवसेना शाखा प्रमुख कमलेश कदमचा देखील समावेश आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कमलेश कदम यांच्यासह संजय शांताराम मांजरे , राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीराम सुंद वेरा , सुनिल देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक यांचा समावेश आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, कमलेश कदम नावाच्या व्यक्तीने फोनकरून आधी नाव व पत्ता विचारला. त्यानंतर बिल्डिंगच्या खाली बोलवून मारहाण केली. मारहाण केल्याची ही घटना सोसायटीच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या गुंडावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.