काँग्रेसमध्ये मोठे बदल, गुलाम नबी आझाद, खरगे यांना महासचिवपदावरून हटवले


23 नेत्यांनी पक्ष नेतृत्वात बदल करण्यासाठी लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. काँग्रेस वर्किंग कमेटीपासून ते राज्यांचे प्रभारी महासचिव देखील बदलण्यात आले आहेत. तसेच काँग्रेसच्या अंतर्गत संघटन निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

सोनिया गांधींनी नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते मधूसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या अंतर्गत सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीची घोषणा केली आहे. याशिवाय अध्यक्षाला कामकाजात मदत करण्यासाठी स्पेशल कमिटी स्थापन्यात आली असून, यामध्ये अहमद पटेल, एके एंटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, के सी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.

याशिवाय गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा आणि लुजिन्हो यांना संघटनेच्या महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. याशिवाय आशा कुमारी, अनुग्रह नारायण सिंह, गौरव गोगोई आणि रामचंद खुंटिया यांना देखील प्रदेश प्रभारी पदावरून हटविण्यात आले आहे.

काँग्रेसने फेरबदल करत 9 महासचिव आणि 17 प्रभारी ठेवले आहेत. महासचिवमध्ये मुकुल वासनिक, हरीश रावत, ओमन चांडी, प्रियंका गांधी, तारिक अनवर, रणदीप सुरजेवाला, जितेंद्र सिंह, अजय माकन आणि के सी वेणुगोपाल यांचा समावेश आहे. तर प्रभारीमध्ये रजनी पाटिल, पीएम पुनिया, आरपीएम सिंह, शक्ति सिह गोहिल, राजीव सातव, राजीव शुक्ला, जितिन प्रसाद, दिनेश गुंडूराव, माणिकम टॅगोर, चेल्ला कुमार, एच के पाटिल, देवेंद्र यादव, विवेक बंसल, मनीष चतरथ, भक्त चरणदास आणि कुलजीत नागरा यांचा समावेश आहे.