‘हे स्विकारले जाणार नाही’, शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त अधिकाऱ्याची संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस


मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक केली होती. नंतर या आरोपींना जामीन देखील मिळाला. राज्यात हे प्रकरण चांगलेच तापले असताना, केंद्रापर्यंत देखील पोहचले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज या निवृत्त अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा करत चौकशी केली.

राजनाथ सिंह यांनी ट्विट करत माहिती दिली की, मुंबईत गुंडांनी हल्ला केलेल्या सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी बोललो. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवर होणारे अशा प्रकारेचे हल्ले हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि दु: खद आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपवर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्याने काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून 65 वर्षीय निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात कमलेश कदम संजय शांताराम मांजरे , राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीराम सुंद वेरा , सुनिल देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक यांना अटक करण्यात आले होते.