अरुणाचल प्रदेशमधून गायब झालेल्या 5 युवकांना चीनने भारताला सोपवले


चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) अरुणाचल प्रदेशमधून गायब झालेल्या 5 युवकांना भारताला सोपवले आहे. सर्व युवकांना आज सकाळी चीनमधून भारताकडे रवाना करण्यात आले. हे सर्व युवक 1 तास चालून किबिथू सीमा चौकी येथे पोहचतील.

याआधी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, अरुणाचल प्रदेशमधून लापता झालेल्या या 5 युवकांनी पीएलए भारताला सोपवणार आहे. पीएलएने दावा केला होता की, हे युवक त्यांच्या भागात आले होते व भारताकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आसामच्या तेजपूर शहराच्या पब्लिक रिलेशन ऑफिसरने देखील अधिकृत ट्विटरद्वारे याची माहिती देत पुष्टी केली आहे.

जवळपास 10 दिवसांपासून हे युवक गायब होते. चीनच्या सैनिकांनी त्यांच्या अपहरण केल्याचे सांगितले जात होते. 7 युवक सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमा भागात शिकारीसाठी गेले होते. यावेळी 5 युवकांना पकडण्यात आले होते. तर दोन युवक स्वतःला वाचवत कसे तरी परतले होते व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.