कोरोना : स्वदेशी ‘कोवॅक्सिन’चे प्राण्यांवरील ट्रायल यशस्वी

ऑक्सफोर्डच्या कोरोना प्रतिबंधक लशीपासून सर्वांना मोठ्या आशा होत्या. मात्र भारतासह अनेक देशातील या लसीचे क्लिनिकल ट्रायल रोखण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे स्वदेशी भारत बायोटेकच्या लसीबाबत चांगली बातमी आहे. भारत बायोटेकला दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजूरी मिळाली असून, कंपनीचा दावा आहे प्राण्यांवरील त्यांच्या लसीचे ट्रायल यशस्वी झाले.

कंपनीने माहिती दिली की, माकडांच्या 4 समूहांवर लसीचे ट्रायल करण्यात आले. या दरम्यान त्यांना लसीचे 2 डोस दिले व लक्ष ठेवण्यात आले. यातील 3 समूहांना 14 दिवसात 3 वेगवेगळ्या लसीचे डोस देण्यात आले. 14 दिवसानंतर लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यादरम्यान त्यांच्यावर कोरोना व्हायरसचा काहीही परिणाम झाला नाही.

परिणामात समोर आले की, ज्या माकडांना लस देण्यात आली होती, त्यांच्यात रोग प्रतिकारशक्ती विकसित झाली होती. त्याच्या हिस्टोपॅथोलॉजिकल टेस्टमध्ये निमोनिया आढळला नाही.

दरम्यान, आयसीएमआरनुसार भारतात कोरोना लसीचे तीन ट्रायल सुरू आहे. यात सीरम इंस्टिट्यूटच्या लसीचे दुसऱ्या (बी) आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. तर भारत बायोटेकच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू होणार आहे. याशिवाय जेडस कॅडिलाने दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल पुर्ण केले आहे.