जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरटेल आणणार स्वस्तातला स्मार्टफोन!


टेलिकॉम कंपनी एअरटेल रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी लवकरच स्वस्तातला स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 4जी असेल. वर्ष 2018 मध्ये जिओने आपला 4जी स्मार्टफोन लाँच केल्यापासूनच एअरटेलच्या फोनची चर्चा सुरू होती. आता पुन्हा एकदा एअरटेल 4जी स्मार्टफोनसाठी वेंडर्सशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. या फोनची किंमत 2500 रुपयांपेक्षा कमी असेल.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, या फोनमध्ये एअरटेलचे सिमकार्ड इनबिल्ट मिळेल. सोबतच फ्री डेटासारखे अनेक ऑफर्स देखील असतील. स्वस्तातल्या स्मार्टफोनसाठी कंपनी स्थानिक कंपन्या मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन मोबाईलशी संपर्कात असल्याचे सांगितले जाते. एअरटेलचा फोन लाँच झाल्यास, जिओ मोठी टक्कर मिळेल. मात्र एअरटेलकडून अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

भारतात जवळपास 40 कोटी लोक फीचर फोनचा वापर करतात. अशा लोकांवर टेलिकॉम कंपन्यांचे प्रामुख्याने लक्ष आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ देखील गुगलसोबत मिळून या वर्षाखेर 10 कोटी 4जी स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या फोनची किंमत देखील खूपच कमी असेल.