या मंदिरात रचले गेले हनुमान चालीसा

देशभरात बजरंगबली हनुमानाची असंख्य मंदिरे आहेत आणि त्या प्रत्येकाची ख्याती विविध कारणांनी आहे. पण देशात असेही एक हनुमान मंदिर आहे जे वेगळ्याच कारणांनी प्रसिध्द असून देशातील असे हे एकमेव मंदिर आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी हे प्राचीन हनुमान मंदिर असून मंदिरात हनुमान बाल हनुमान रुपात आहेत. येथील मूर्ती स्वयंभू असून या मूर्तीची स्थापना पांडवांनी केल्याचे मानले जाते. दिल्ली हे पूर्वी पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ नावाने ओळखले जात होते. या राजधानीत पांडवांनी पाच हनुमान मंदिरे उभारली होती त्यातील हे एक आहे.

या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे संत तुलसीदास जेव्हा येथे दर्शनाला आले तेव्हा त्यांनी येथेच आज लाखो भाविक ज्या स्तोत्राचे नित्यपठन करतात त्या हनुमान चालीसा स्तोत्राची रचना केली होती. त्यावेळी दिल्लीत सम्राट अकबर सत्तेवर होता. त्याने तुलसीदासाना हनुमानाचा काही चमत्कार दाखव असे आव्हान दिले तेव्हा तुलसीदासांनी खरोखर हनुमान चमत्कार दाखविला. तेव्हा अकबराने त्यांना चांद भेट म्हणून दिला. तो या मंदिराच्या कळसावर लावला गेला. मशिदीच्या टोकावर दिसणारा चांद या मंदिराच्या कळसावर सुद्धा आहे आणि हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानले जाते.

या मंदिराचे बांधकाम राजा मानसिंग यांनी अकबराच्या काळातच केले होते. त्यानंतर त्यात अनेक बदल झाले मात्र हनुमानाची मूर्ती आणि तिचे स्थान बदलले गेले नाही. या मंदिरात रामसीता, लक्ष्मी विष्णू, शंकर पार्वती, नंदी, हनुमानाची गदा, दुर्गा, गणेश आणि सरस्वती यांच्याही मूर्ती आहेत. दर मंगळवार आणि शनिवार येथे खूप गर्दी असते आणि त्या काळात मंदिर चोवीस तास खुले असते. या हनुमंताचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकट हरण होते असा विश्वास आहे. देश विदेशातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असते.