६२ वर्षाच्या अजगर मादीने दिली सात अंडी

अजगर मादीने अंडी घालणे ही घटना नवलाची नसली तरी अमेरिकेच्या सेंट लुईस झु मध्ये मात्र अशी घटना नवलाची ठरली आहे. येथील अजगर मादीने सात अंडी दिली आहेत. ही अजगर मादी ६२ वर्षांची आहे आणि तिने नर अजगराशिवायच अंडी घातल्याने तो कुतूहलाचा विषय झाला आहे. गेली २० वर्षे ही अजगर मादी नराच्या संपर्कात आलेली नाही असे सांगितले जात आहे.

हर्पीटॉलॉजी मॅनेजर मार्क वेनर या संदर्भात म्हणाले ही दुर्मिळ घटना असली तरी असंभव नाही. बरेच वेळा साप पार्टनरशिवाय सुद्धा अंडी देतात कारण त्यांच्यात स्पर्म साठविण्याची क्षमता असते. पण बॉल पायथन या जातीच्या अजगराची मादी ६० वर्षाची होण्याअगोदर अंडी देणे बंद करते. या झु मधील मादी ६२ वर्षांची आहे. प्राणी संग्रहालयातील ही सर्वात वयोवृद्ध मादी आहे. तिच्या सात अंड्यातून पाच पिले आहेत आणि उरलेली दोन अंडी सँम्पल तपासणी साठी नेली गेली आहेत. त्या तपासणीतून हे प्रजनन नर संपर्कामुळे झाले आहे की नाही हे समजणार आहे.

अजगराची ही मादी १९६१ मध्ये प्राणीसंग्रहालयात आणली गेली. २००९ मध्ये तिने खूप अंडी दिली होती पण त्यातून एकाही पिलू जन्माला आले नाही. १९९० मध्ये सुद्धा तिने अंडी घातली होती पण त्यावेळी ती नर अजगराच्या सोबत होती असेही सांगितले जात आहे.